नवी दिल्ली :
प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार आहे,” अशी माहिती दिली.
देशभरात लस मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव केली. “लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. देशभरात लस पुरवली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्यांनी मोफत लसीच्या घोषणेवर सारवासारव केली.
सीरम इन्स्टिट्युच्या कोविशील्ड लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच, देशभरात लसीकरणाची रंगीत तालिमही सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचंही लवकरच लसीकरण होईल असा आशावादव्यक्त केला जातोय. मात्र, हे लसीकरण मोफत असेल की पैशांनी याबाबत काहीही स्पष्ट झाले नव्हते. आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करत मोफत लसीकरण असणार असल्याचे सांगितले. मात्र, काहीच वेळात त्यांनी घुमजाव करत केवळ पहिल्याच टप्प्यातील लसीकरण मोफत असल्याचे सांगितले.