हैदराबाद :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ रोजी ११ व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या २१६ फूट उंचीच्या मूर्तीचे उद्घाटन होणार आहे.
ही मूर्ती हैदराबादमध्ये शमशाबाद येथे ४५ एकर जागेवर स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीला Statue of Equality स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी अर्थात समानतेची मूर्ती असे नाव देण्यात आले आहे.
स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ही संत श्री रामानुजाचार्य यांची बैठकीच्या मुद्रेतील मुर्ती आहे. जगातील सर्वात उंच मूर्तींमध्ये ही दुसऱ्या क्रमांकाची मूर्ती आहे. ही मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त या पाच धातूंचा वापर करून तयार केली आहे. ही पंचधातूची मूर्ती घडविण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी लागला. संत श्री रामानुजाचार्य यांची आणखी एक मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन केली जाईल. रामानुजाचार्यांच्या १२० वर्षांच्या प्रवासाच्या स्मरणार्थ १२० किलो सोन्यापासून तयार केलेली दुसरी मूर्ती मंदिरात स्थापन केली जाईल.
स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी भोवतालच्या परिसरात १०८ दिव्य देशम अर्थात मंदिरं आहेत. या मंदिरांमधून आकर्षक नक्षीकाम केले आहे. पंतप्रधान या मंदिरांची पाहणी करतील. तसेच संत रामानुजाचार्य यांच्या कार्याची महती सांगणारा एक छोटा त्रिमिती शो बघतील. पंतप्रधानांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन होण्याआधी मूर्ती ज्या परिसरात आहे त्या परिसरात १ हजार ३५ हवनकुंडांमध्ये सुमारे दोन लाख किलो गायीच्या तुपाचा वापर करून हवन केला जाईल.
संत रामानुजाचार्य यांची भव्य मूर्ती ५४ फूट उंचीच्या ‘भद्र वेदी’ नावाच्या इमारतीवर स्थापन करण्यात येईल. या इमारतीमध्ये वैदिक डिजिटल ग्रंथालय (पुस्तकालय), वैदिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी संशोधन केंद्र, अभ्यासकेंद्र अशा आधुनिक सुविधा असतील. इमारतीत अनेक प्राचीन हस्तलिखितांचा अभ्यास करण्याची सोय आहे. संत रामानुजाचार्य यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी विशेष दालन असेल.
कोण होते संत संत रामानुजाचार्य?
वैष्णव संत रामानुजाचार्य यांचा जन्म १०१७ साली तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे तामीळ ब्राह्मण कुटुंबात झाला. कांची येथे गुरु यमुनाचार्यांकडून त्यांनी दीक्षा घेतली. श्रीरंगम येथील यथीराज यांच्याकडून संन्यास घेतला. यानंतर त्यांनी भारतभर फिरून वेदांत आणि वैष्णव धर्माचा प्रसार केला. तसेच त्यांनी श्रीभाष्याम आणि वेदांत संग्रह या ग्रंथांची रचना केली. रामानुजाचार्य यांनी वयाच्या १२० व्या वर्षी म्हणजेच ११३७ मध्ये श्रीरंगम येथे अखेरचा श्वास घेतला.
आयसीआरआयएसएटीला भेट देणार पंतप्रधान मोदी
पंतप्रधान स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे उद्घाटन करतील. तसेच आयसीआरआयएसएटी (International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics – ICRISAT) या आंतरराष्ट्रीय संस्थेला भेट देतील. या संस्थेच्या स्थापनेला ५० वर्ष होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान भेट देणार आहे. आयसीआरआयएसएटी ही संस्था आफ्रिकेतील कमी पाणी असलेल्या भागांमध्ये शेती कशी करावी याबाबत संशोधन करते. हैदराबदमधील संस्थेच्या कार्यालयात भारतातील कमी पाणी असलेल्या भागांमध्ये शेती करण्यासाठी संशोधन केले जाते.