उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले सरप्राईज, सुनिल चांदेरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष

0
slider_4552

पुणे :

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे डॉ. दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्षपदी मुळशीचे सुनील चांदेरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण २१ जागांपैकी १७ जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला तर काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीच्या आधीच आधीच १४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर सात जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे एकहाती वर्चस्व असल्याने ते म्हणतील त्यालाच अध्यक्षपद मिळणार होतं. त्यानुसार त्यांनी पुरंदरच्या डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाला पसंती दिली. त्यानंतर दुर्गाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील वाल्हे या गावात जल्लोष करण्यात आला आहे. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे पुरंदरच्या वाल्हे गावचे रहिवासी आहेत. पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे कळताच गावात फटाके फोडून, गुलाल उधळून आणि पेढे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

तर विजयश्री खेचून आणणारे सुनील चांदेरे यांना पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसला सरप्राईज दिले आहे. जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदाच्या रूपाने सुनील चांदेरे यांना पक्षनिष्ठेचेच फळ मिळाले आहे. तथापि चौदा वर्षांनंतर मुळशीला जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्षपदाचा मान मिळाल्याने तालुक्यातील सहकाराच्या वाढीला खतपाणी मिळणार आहे.

See also  सेवेच्या माध्यमातून संवाद वाढवा : चंद्रकांत पाटील