दिल्ली :
भारताच्या क्रीडा इतिहासातील सर्वोत्तम महिला खेळाडूंपैकी एक असलेली माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावण्याचे काम करून दाखवली. वर्ल्ड ऍथलेटिक्सच्या वतीने देण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कारांमध्ये तिला ‘वुमन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बुधवारी उशिरा वर्ल्ड ऍथलेटिक्सने याबाबतची घोषणा केली.
या कारणासाठी मिळाला पुरस्कार
धावपटू पी टी उषानंतर ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्समधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अंजू हिला वर्ल्ड ऍथलेटिक्सने खेळांमधील योगदान आणि स्त्री पुरुष समानता यासाठी कार्य केल्यामुळे हा पुरस्कार दिला. त्यांनी ट्विट करताना लिहिले, ‘भारतामध्ये खेळांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंजू हिने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तिने आपल्या खेळाने अनेकांना प्रेरित केले असून, ती या पुरस्कारासाठी अगदी योग्य ठरते.’
अंजू ही क्रीडा प्रशासनासह स्त्री-पुरुष समानतेचे देखील काम पाहते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली भारताची मान
अनेक जागतिक स्पर्धांमध्ये तिने भारतासाठी नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली होती. २००४ अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६.८३ मीटर उडी मारत तिने सहावे स्थान पटकावले होते. मात्र, पाचव्या क्रमांकावरील अमेरिकन खेळाडू डोपिंगमध्ये अडकल्याने ती पाचव्या क्रमांकावर पोहोचली होती. २००३ पॅरीस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली केलेली.
क्रीडाक्षेत्रात दिले भरीव योगदान
अंजू हिने निवृत्तीनंतर भारतीय क्रीडाक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. २०१६ मध्ये तिने युवा ऍथलीटसाठी अकादमीची सुरुवात केली होती. त्यानंतर विविध पदांवर राहत ती भारतीय क्रीडा क्षेत्राशी संलग्न आहे. सध्या ती भारतीय ऍथलेटिक्स संघटनेची उपाध्यक्ष म्हणून काम पाहते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेल्या शानदार कामगिरीचे बरेचसे श्रेय अंजू हिला दिले जाते.