दोन डोस मधील अंतर कमी करण्याचा विचार केंद्राने करावा : राजेश टोपे

0

मुंबई :

कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांमध्ये 84 दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रामधील अंतर कमी केले तर लसीकरणाच्या वेगाला गती देता येईल, याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, या मागणीचा पुनरुच्चार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांच्याकडे केला.

दरम्यान, राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहितीही त्यांनी मांडविया यांना दिली.

लसीकरणाचा आढावा

केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी गुरुवारी सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत टोपे मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोविड प्रतिबंधात्मक कोवॅक्सिन लशीच्या दोन मात्रांमध्ये 28 दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांमध्ये 84 दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.

कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रामधील अंतर कमी करण्याची गरज असून त्याचा फेरविचार होण्याची गरज आहे. तसे झाल्यास लसीकरणाला गती देता येईल. लसीकरणाची गती वाढावी यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य सारखे अभियान राबविण्यात आले. याचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी फायदा झाला. आता लसीकरणाची शिबिर आणि वेळही वाढवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने व्यापक प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्य, महसूल, नगरविकास, शिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी काही स्वयंसेवी संस्था, ओपिनियन लीडर्स, धर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे टोपे यांनी यावेळी सांगितले.

See also  १०६ आमदारांना निलंबित केलं तरी संघर्ष करत राहणार : देवेंद्र फडणवीस