पुणे :-
राज्य सरकारने ईडब्ल्युएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात सरकारच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे….एक मराठा लाख मराठा… अशा घोषणा देत सकल मराठा समाज आणि मराठत्त क्रांती मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.
या आंदोलनाला मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, , रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुजिंर सचिन आडेकर, महेश टेळे, किशोर मोरे, मीना कुंजीर, गणेश मापारी, श्रृतिका पाडाळे यांसह मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोंढरे यांनी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील आरक्षणांसह सर्व याचिकामध्ये 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन करुन देण्यात आलेले आरक्षण आव्हानित आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातुन (इडब्ल्युएस) आरक्षण दिल्यास मराठा आरक्षणाच्या घटनापीठासमोरील अंतिम सुनावणी मध्ये युक्तीवार करताना कायदेशीर अडचणी निर्माण होतील. राजकीय सोयीनुसार हा निर्णय घेतला असून सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित एससीबीसी केसचा पाया खिळखिळीत करण्यासाठीच असा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा खून आह असे सांगीतले.
रघुनाथ चित्रे पाटील बोलले की, सरकार मराठा समाजातील काही ठराविक लोकांना गाजर दाखवून हाताशी धरुन फुट पाडण्याचे कारस्थान करीत आहे. परंतु, मराठा समाजाचे सुरुवातीपासूनचे आंदोलनातील लोक एकत्र आहेत. चार जणांना हाताशी धरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे, जी मराठा समाजाची मागणीच नाही ती मराठा समाजाला थोपवणे ही बाब चुकीची आहे. इडब्ल्युएस आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणे लावण्याचे कारस्थान सरकार करीत आहे. गेल्या तीस वर्षापासूनच्या मागणीवर अशा प्रकारचे खाणेरडे राजकारण मराठा समाजातीलच काही नेते करीत असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
राजेंद्र कुंजीर प्रतिक्रिया दिली की, या सरकारने मराठा समाजासमवेत रडीचा डाव खेळून डावपेच केले आहेत. हे आगामी काळात समजून देणार आहोत. त्याचबरोबर मराठा समाजात जनजागृती, साक्षरता करुन देऊन संघर्षाची तयारी करणार आहोत.