सुस :
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या तेवीस गावांसाठी पुढील निवडणूक होईपर्यंत च्या काळापर्यंत नवीन समाविष्ट गावांना त्यातील समस्या सोडविण्याकरिता व विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी च्या वतीने भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या तेवीस नगरसेवकांना नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांची प्रभारी नगरसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस गावाची जबाबदारी सक्षम नगरसेवक अमोल बालवडकर यांना सोपविण्यात आली आहे. त्यांच्या कामाची पद्धत आणि सुसगावातील संपर्क लक्षात घेऊन त्यांची निवड केली आहे.
महापालिकेमध्ये नवीन समावेश झालेल्या सुस गावातील समस्या नगरसेवक अमोल बालवडकर यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. तसा अभ्यास त्यांनी पूर्वी पासूनच सुुस गावात संपर्क ठेवून केलेला आहे. यामुळे गावातील समस्या नगरसेवक बालवडकर नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त होत आहे. बाणेर – बालेवाडी प्रभागात चालु असलेल्या स्मार्ट कामा प्रमाणे सुस गावात देखील सोयी सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास नागरीकांना वाटत आहे.
यावेळी मॅक न्यूज शी बोलताना अमोल बालवडकर यांनी सांगितले की, महापालिकेत समाविष्ट झालेले सुसगाव हे नव्याने विकसित होणारे गाव आहे. येथिल ग्रामस्थांना महापालिकेत समाविष्ट होताना अनेक प्रश्न पडले आहेत. या सर्व प्रश्नांचा निराकरण करून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यावर प्रामुख्याने भर देणार आहे, असे त्यांनी सांगितले. गावामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्राचा फार मोठा वारसा आहे. तो जोपासून त्याची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.