नवी दिल्ली :
ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांच्या मागणीत होत असलेली वाढ आणि त्यांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोटिस जाहीर केली आहे. या नोटिसनुसार ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची किंमत एका वर्षात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही. शिवाय सरकारने कंपन्यांना आपल्या एमआरपीची माहिती सरकारला देण्यात सांगितले आहे.
मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग ऑथोरिटी कडून देण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की वैद्यकीय उपकरणांच्या मॅक्झिमम रिटेल प्राईस म्हणजेच एमआरपीमध्ये एका वर्षात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही.
२२ मेपर्यत द्यायची आहे माहिती
सरकारने सर्व मॅन्युफॅक्चर्स आणि आयातदारांना या दोन वैद्यकीय उपकरणांच्या एमआरपीची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. त्यांना पुढील सात दिवसांच्या आत ही माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती देण्याची अंतिम मुदत २२ मे २०२१ ही आहे.
मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर असाच लागला होता लगाम
मार्च २०२० मध्ये जेव्हा भारतात कोरोनाच्या संसर्गाची सुरूवात झाली तेव्हा मोठी मागणी असल्यामुळे मास्क आणि हॅंड सॅनिटायझरच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्सने या वस्तूंच्या किंमतीला लगाम घालण्यासाठी २१ मार्च २०२०ला एक नोटिफिकेशन काढले होते. त्यानंतर सरकारने सॅनिटायझर आणि मास्कची किंमत ठरवली होती. सरकारच्या या निर्णयानंतर या दोन वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आल्या होत्या.
ही सर्व माहिती द्यावी लागेल
ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या एमआरपीची माहिती मॅन्युफॅक्चर्स आणि आयातदारांना एका विशेष फॉर्मेटमध्ये द्यावी लागेल. यामध्ये ब्रॅंड नाव, टाईप ऑफ सर्टिफिकेशन, युनिट ऑफ सेल्स, डिस्ट्रिब्युटर, स्टॉकिस्ट, हॉस्पिटलसाठीची किंमत, रिटेल प्राईस, जीएसटी, १ मेला एमआरपी इत्यादी माहिती जमा करावी लागेल.