पुणे :
पिंपरी ते स्वारगेट मेट्रो प्रवास लवकरच सुरू होणार आहे. कसबापेठ (बुधवार पेठ), मंडई, स्वारगेट या तीन भूमिगत स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच खुला केला जाणार आहे.
पीसीएमसी ते स्वारगेट (17.4 किमी) या मार्गावर 14 स्थानके आहेत. तर वनाझ ते रामवाडी (15.7 किमी) या मार्गावर 16 स्थानके आहेत. 6 मार्च 2022 रोजी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्यात पीसीएमसी ते फुगेवाडी (7 किमी, 5 स्थानके) आणि वनाझ ते गरवारे (5 किमी, 5 स्थानके) असे एकूण 12 किमी अंतरावरील 10 स्थानकांदरम्यान मेट्रो सुरू झाली.
त्यानंतर एक ऑगस्ट 2023 रोजी फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट (6.9 किमी, 4 स्थानके) आणि गरवारे ते रुबी हॉल क्लिनिक (4.7 किमी, 7 स्थानके) अशी एकूण 11.6 किमी अंतरावरील अकरा स्थानकांदरम्यान मेट्रो सुरू करण्यात आली. उर्वरित रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानची मेट्रो सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झाली. आता सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानची मेट्रो लवकरच सुरू करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पर्पल मार्गिकेवरील (लाईन 1) कसबापेठ (बुधवार पेठ), मंडई, स्वारगेट या तीन भूमिगत स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता महा मेट्रो कडून उद्घाटनाचा मुहूर्त शोधला जाणार आहे.