दिल्ली :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय रणसंग्रामाची घोषणा करण्यास निवडणूक आयोग सज्ज होत आहे.
महाराष्ट्र आणि झारखंड मधील विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या दौऱ्याची माहिती समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोग प्रथम झारखंडचा दौरा करेल. कुमार आणि इतर आयुक्त 23 आणि 24 सप्टेंबर रोजी झारखंड मध्ये असतील.
झारखंड नंतर आयोग 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचा दौरा करेल. निवडणुकांची वेळापत्रक जाहीर करण्याआधी आयोग संबंधित राज्यांचा दौरा करतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंडच्या दृष्टीने आयोगाच्या दौऱ्यांचे महत्त्व वाढले आहे.
सन 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यावेळी आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचे ठरवले. मागील वेळी महाराष्ट्र आणि झारखंड मधील निवडणुका वेगवेगळ्या कालावधीत झाल्या. यावेळी त्या एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ चालू वर्षात 26 नोव्हेंबर रोजी तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षाच्या 5 जानेवारी रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.