पुणे :
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून आज गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी वाहतूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 6 तास वाहतूक बंद असणार आहे. पनवेल कर्जत दुहेरी मार्गाचे काम 18 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान करण्यात येणार आहे.
कामाच्या वेळेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असेल. हलक्या व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक किमी 55 वरून वळवण्यात येईल. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग 46 वरून वाहने नेता येतील.
पुण्याकडून मुंबईला येणारी सर्व वाहने पनवेल एक्झिटवरून वळवण्यात येऊन ती एनएच 48 वरून करंजाडे मार्गे कळंबोली आणि एनएच 48 वरून पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने पुढे जातील. मुंबईकडे येणारी वाहतूक वळवण्यात येणार असून हलकी वाहने आणि बसेस मुंबई मार्गिकेवर किमी 39.800 खोपोली एक्झिटवरून एनएच 48 वर येतील.
तर पुण्याकडून मुंबईकडे येणारी सर्व वाहने खालापूर एक्झिटवरून एनएच 48 वर आणि खोपोली शहरातून शेडुंग टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने नेता येतील.