नवी दिल्ली :
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल अखेरीस जागतिक संघटनेने घेतली आहे. United World Wrestling संघटनेने भारतीय कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कुस्तीपटूंना गेल्या काही दिवसांत मिळणारी वागणूक ही चिंताजनक असल्याचं सांगत जागतिक संघटनेने ब्रिजभूषण यांच्यावर केलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघाचा कारभार आपल्या ताब्यात घेतल्यानंतर UWW ने नवीन निवडणुकांसाठी ४५ दिवसांचा कालावधी दिला होता. जर या कालावधीत निवडणुका झाल्या नाहीत तर कुस्ती महासंघ बरखास्त करण्यात येईल असा इशारा जागतिक संघटनेने दिला आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना त्रसस्थ झेंड्याखाली खेळावं लागेल असंही UWW ने स्पष्ट केलं आहे.
मंगळवारी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी नेते टिकैत यांच्या मध्यस्थीमुळे खेळाडूंनी आपला हा निर्णय ५ दिवस पुढे ढकलला.