पुणे :
केनिया संघाने भारताला अंतिम लढतीत पराभूत करताना सहाव्या विश्वकरडंक रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मागील विश्वकरंडक स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत केनियाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले होते. यास्पर्धेत मात्र केनियाने भारतावर विजय मिळविताना पराभवाची परतफेड केली.
म्हाळुंगे – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम येथील मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत केनिया संघाने भारताला ७-४ असे पराभूत केले. मध्यंतराला केनिया संघ ४-२ अशी २ गोलची आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफिंसने ३ (१.२५, २३.२५ व २४.००), बोनफेसने २ (२१.०० व २२.००) तर मोझेसने (१०.३६) व ब्रीयान (१२.२८) यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून सचिन सैनीने २ (२२.४० व ३८.२०), आदित्य सुतार (५.०८) व आकाश गणेशवाडे (११.२०) यांनी प्रत्येकी १ गोल केला.
पुरुष गटाचे विजेत्यांचे पुरस्कार वितरण उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्याचे माजी महापौर आणि भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राज्य भाजपाचे चिटणीस धीरज घाटे, भारतीय रोलबॉल संघटनेचे चेयरमन सुर्यकांत काकडे, आशियाई रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, उपाध्यक्ष मनोज यादव, सचिव चेतन भांडवलकर, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
*रोलबॉल खेळाचा ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले*
पुण्यात जन्मेलेला रोलबॉल हा खेळ सध्या ५० पेक्षा जास्त देशात खेळला जात आहे. असे असून देखील या खेळाचा समावेश ऑलिम्पिक व आशियाई क्रीडा स्पर्धेत झालेला नाही, मात्र, या खेळाला या दोन्ही प्रतिष्ठीत स्पर्धामध्ये सहभागी होता यावे, यासाठी आम्ही सर्वजन प्रयत्नशील असल्याचे, *सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात केनिया संघाने विजेतेपद पटकावले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.
२१ एप्रिल पासून या विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडीयम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटना, भारतीय रोलबॉल संघटना व महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुषांचे २३ व महिलांचे ११ असे २७ संघ सहभागी झाले होते. रोलबॉल सोबत जोडले गेल्याने निश्चितच आनंद होत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ यानुसार रोलबॉल खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आगामी वर्षात हा भारतातील खेळ निश्चित जगावर आपली छाप सोडेल, असा विश्वास देखील यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांतदादा पाटील रोलबॉल खेळासोबत जोडले गेल्याने विश्वकरंडकासारखी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करता आले. भारतीय खेळाडूना आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबत खेळण्याचा आनंद घेता आला. तसेच यावेळी १७ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने आलेले भारतातील खेळाडूंना देखील भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पहाता आला, असे सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेचे संयोजन समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी बोलताना सांगितले.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत सेनेगल संघाने लॅटव्हिया संघाला ८-५ असे पराभूत केले. मध्यंतराला सेनेगल संघाने ५-० अशी आघाडी घेतली होती. सेनेगल संघाकडून क्रिस्ट रोबर्टने ६ (१.२८, २.००, ५.३५, ६.००, २६.१०, २७.००) तर मौहामेट व खादीम यांनी प्रत्येकी एक गोल केला. लॅटव्हिया संघाकडून इगोरस सोकोव्ह्जने ४ (१६.०२,१६.१२, २०.००, २०.४८ ) तर व्हिस्टरुउस सिमेरमणीसने एक गोल केला.
तत्पूर्वी पुरुष गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने सेनेगलला १०-७ असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ५-३ अशी दोन गोलची आघाडी घेतली होती. भारताकडून आकाश गणेशवाडेने ३ (९.३२, ३१.४७, ४०.००), मिहीर साने (९.३२ व ३१.१०) व सचिन सैनी (१४.४०, ३६.३८) यांनी प्रत्येकी २ तर श्रीकांत साहू (४२.११) आदित्य सुतार (७.१४) व हर्षल घुगे (२४.०२) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सेनेगल संघाकडून मौहामेटने तब्बल सहा (१३.५२, १९.०२, १९.४५, २७.४८, ३४.३० व ४८.४३) गोल मारले. मामाडौऊ अलिओने (४३.५९) एक गोल केला.
पुरुष गटाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत केनिया संघाने लॅटव्हिया संघाला १४-१ असे पराभूत केले. मध्यंतराला केनियाने ९-१ अशी विजयी आघाडी घेतली होती. केनिया संघाकडून ग्रीफिंसने ६ (२१.३४, २३.४२, २४.१९, २५.३४, २७.२०, ३१.३३), जोशुआ ओयांगोने ३ (८.४६, १५.१३, १९.४२), जोशुआ चोटीने २ (१३.५४, २२.५४), तर मोजेस (२८.४३), जेम्स म्वंगी (३०.१२) व बोनफेस (०.५९) यांनी प्रत्येकी एक गोल केला. लॅटव्हियाकडून व्हिस्टरुउस सिमेरमणीसने (१९.१७) एक गोल केला.