नागपूर :
गरज आधारित, प्रदेशाच्या अनुरूप तसेच तंत्रज्ञान, संशोधन, उद्यमशीलता, भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून देशाला, समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन वैज्ञानिकांनी केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले.
नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – निरीच्या सभागृहात इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या वतीने आयोजित ‘वुमन इन सायन्स अँड एन्टरप्रेनरशिप ‘ – वाईस – 2023 ‘ कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी निरीचे संचालक डॉ . अतुल वैद्य, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी उपस्थित होत्या.
सिद्ध झालेले तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक व्यवहार्यता तसेच विपणन क्षमता या चार गोष्टी शिवाय संशोधनाला महत्त्व नाही. नागपूर मध्ये असणारी फ्लाय एश, नाग नदीचे पाणी, कचरा, घनकचरा अशा गोष्टींवर संशोधन होणे आवश्यक आहे अशी सूचना नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
उत्तर भारतामध्ये पंजाब , हरियाणा येथे गहू तांदळा सोबतच बायोबिटूमिनच उत्पादन घेतले जात असून कृषीचे वैविध्यीकरण आता ऊर्जा आणि वीज क्षेत्रात होत आहे. नागपूर मध्ये वेकोली तसेच इतर सार्वजनिक उपक्रम क्षेत्राच्या कंपन्याजवळ ज्या पडीक जागा आहे त्यामध्ये बांबू लागवड करून बायो इथेनॉलची , बायो बिटूमन निर्मिती शक्य आहे . कोळशाच्या तुलनेत बांबू जाळल्याने पर्यावरणाचे रक्षण होईल त्यांनी सांगितले . उमरेडच्या पाचगाव येथे बुटीबोरीच्या एमआयडीसी मधून रेडीमेड गारमेंटचा जो कचरा निर्माण होतो त्यापासून टिकाऊ आणि सुंदर असे गालीचे निर्माण करण्यासाठी 1,200 महिलांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कच्च्या मालामध्ये मूल्यवर्धन करून डिझाईन आणि पॅकेजिंग करून वैश्विक बाजारपेठेत तिचे विपणन करता येते असे त्यांनी अधोरेखित केले.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रकल्पाच्या बांधकाम खर्चामध्ये कपात करण्यात आल्याचे सांगून नुकत्याच भूमिपूजन झालेल्या इंदोरा ते दिघोरी या पुलामध्ये मलेशियन तंत्रज्ञान वापरून उडानपुलाच्या दोन पियर्स मधील अंतर कमी करुन तसेच पुलावरील बीम हा स्टील फायबर मध्ये कास्ट करून सुमारे 1,600 कोटी रुपयांच्या बांधकामाला 1 ,000 कोटी मध्ये आता करता येणे शक्य आहे यातून 600 कोटींची बचत झाली असल्याचा गडकरी यांनी आवर्जुन उल्लेख याप्रसंगी केला.
इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संशोधनातील नव -नव्या संधी शोधून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी ‘ वुमन इन सायन्स अँड आन्टरप्रेणरशिप ‘ वाईस – 2023 ‘ कार्यक्रमाच्या निमित्ताने केले .