मुंबई :
महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील मराठी माणसाची आहे.
जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, मराठी भाषा व शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह श्रीमंत सरदार सरदेसाई, श्रीमती धनश्री सरदेसाई, जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक, बीएमएफ चे अध्यक्ष संदीप दीक्षित, जर्मन कौन्सुलेटचे प्रतिनिधि डॉ. चव्हाण, श्री. आनंद गानू , श्री विजय पाटील यांसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विश्व मराठी संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाचे कौतुक करून केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले मराठी संस्कृतीचे महत्त्व आपण बाहेर देशात असताना प्रभावीपणे जाणवते. आज विविध क्षेत्रांत मराठी माणूस पुढे गेलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याबरोबरच शक्तिशाली अर्थव्यवस्था निर्माण करण्यामध्ये विदेशात असलेल्या भारतीयांचे योगदान खूप मोठे आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली, येथील उद्योजकता वाढवली तर महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मंत्री श्री गडकरी यांनी सांगितले.