ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय

0
slider_4552

राज्यात येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत या निवडणुका स्वतंत्रपणे नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

याबाबत माहिती देताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार म्हणाले, “आगामी काळात राज्यात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय बुधवारी शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं घवघवीत यश मिळवलं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिलं आहे.

कोविडच्या संकटामुळं औरंगाबादची महापालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ती आता येत्या काळात होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेची निवडणुकही येत्या काळात होणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपानेही कंबर कसली आहे.

या निवडणुकांच्या आधी झालेल्या विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका या लिटमस टेस्ट ठरणार असल्याने भाजपासाठी महत्वाच्या होत्या. मात्र, त्यात त्यांना पाचपैकी एकाच जागेवर समाधाान मानावे लागल्याने आता पुढील निवडणुकांचं त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचं मोठं आव्हान असणार आहे.

See also  डिसेंबरपूर्वी नोंदणी केल्यास पुढील चार महिने मुद्रांक सवलत